नगराध्यक्ष शेख रफिक यांचा ‘धडाका’; पदभार स्वीकारताच हिमायतनगरमध्ये स्वच्छतेसाठी ‘ॲक्शन मोडवर’

हिमायतनगर (ताओ प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी):
हिमायतनगर शहराच्या राजकीय इतिहासात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांनी पदभार स्वीकारताच विश्रांतीला पूर्णविराम देत थेट मैदानात उतरून कामाला सुरुवात केली आहे. सध्या ते ज्या कार्यतत्परतेने आणि ‘ॲक्शन मोड’ मध्ये काम करत आहेत, त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत.
स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छतेची पाहणी
आज नगराध्यक्ष शेख रफिक यांनी हिमायतनगर शहराच्या स्वच्छतेबाबत स्वतः लक्ष घातले. बसस्थानकासह मुख्य रस्त्यांवरील कचरा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः हजर राहून स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले. केवळ आदेश न देता प्रत्यक्ष जागेवर उभे राहून काम करून घेण्याच्या त्यांच्या या पद्धतीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कर्मचाऱ्यांना कडक ताकीद
शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी येणार नाहीत, याची कटाक्षाने दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी नगरपंचायत स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना ठणकावले आहे.
नागरिकांना आवाहन
”माझ्या शहराचा प्रत्येक रस्ता आणि नागरिक मला उत्तरदायी आहे,” असे सांगत नगराध्यक्षांनी जनतेला आवाहन केले आहे की, स्वच्छतेसह इतर कोणत्याही समस्या असल्यास त्या थेट कळवाव्यात. हिमायतनगरला स्वच्छ, सुंदर आणि प्रगत शहर बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
”जोपर्यंत हिमायतनगरच्या शेवटच्या माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसून तिथे विकासाचे हास्य फुलत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हा माझा शब्द आहे!”
— शेख रफिक शेख मेहबूब (नगराध्यक्ष, हिमायतनगर)



