टेंभीतील सिमेंट रस्त्यात भ्रष्टाचाराचा संशय; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील टेंभी येथे नुकत्याच करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित रस्त्याच्या कामात नियमांनुसार आवश्यक तेवढे सिमेंट न वापरता निम्म्यापेक्षाही कमी प्रमाणात सिमेंट वापरून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
रस्त्याच्या पृष्ठभागावर ठिकठिकाणी गिट्टी व रेती स्पष्टपणे दिसून येत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निकृष्ट कामामागे ठेकेदार, ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच यांच्या संगनमतातून भ्रष्टाचार झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये अशा प्रकारची हलगर्जी व भ्रष्टाचार होणे गंभीर बाब असून संबंधित कामाची तातडीने तांत्रिक चौकशी करण्यात यावी. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन निकृष्ट दर्जाच्या कामाची जबाबदारी निश्चित केली जाईल का, याकडे टेंभी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



