माळवागद–सातघरी मार्गावर निकृष्ट दर्जाचे रस्तेकाम; ठेकेदार-इंजिनिअर संगनमताचा आरोप

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : माळवागद ते सातघरी मार्गावरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामाच्या ठिकाणचे छायाचित्रे पाहता आवश्यक दर्जाचा मोठा गोटा न वापरता मुरूममिश्रित साहित्य टाकून काम करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदारांकडून दर्जाहीन साहित्याचा वापर करून भ्रष्टाचाराचा कळस गाठण्यात येत असून महागाव तालुक्यात ठेकेदार व अभियंते यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात निधी हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
“निकृष्ट दर्जाचे रस्तेकाम झाल्यास काही महिन्यांतच रस्ता उखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाचा निधी वाया जाणार असून नागरिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागेल,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात यावे, अशी मागणी माळवागद येथील नागरिकांनी केली आहे.



