साई इजारा ग्रामपंचायतीत पाणीटंचाई तीव्र; जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी संताप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यातील साई इजारा ग्रामपंचायत हद्दीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतातून डोक्यावर पाणी आणावे लागत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने विविध योजना असूनही पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीत एकहाती कारभार सुरू असून पाणीपुरवठा योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून त्यामुळे योजना बंद पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत परिसरातील पाणी फिल्टर यंत्रणा बंद अवस्थेत पडून असून त्याचा नागरिकांना कोणताही लाभ होत नसल्याची तक्रार आहे. महिलांना दररोज लांब अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी संबंधित मंत्री महोदयांना निवेदन देऊन साई इजारा येथे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून तातडीने कार्यान्वित करावी, तसेच जलजीवन योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



