एकनाथ नगर प्लॉट विक्रीला न्यायालयाचा ब्रेक; अवैध व्यवहारांना चपराक

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरातील फुलसावंगी रोडवरील, दिवाणी व फौजदारी न्यायालयाजवळ विकसित करण्यात आलेल्या एकनाथ नगर (एकनाथ नगरी) ले-आऊटमधील प्लॉट विक्रीस महागाव दिवाणी न्यायालयाने तूर्तास मनाई हुकूम जारी केला आहे. या आदेशामुळे प्लॉट क्रमांक १, ४, ५, ६, ७, ८ व ९ यांच्या खरेदी-विक्रीवर मज्जाव करण्यात आला असून संबंधित विक्रेत्यांना मोठा धक्का बसला आहे.
उल्हास अहाळे विरुद्ध आदित्य एकनाथ चिन्नावर (दावा क्र. ६८/२०२५) या प्रकरणात २ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी झाली. वादी गैरहजर असताना त्यांचे वकील ॲड. सुदर्शन देशमुख यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने अर्ज क्र. ५ खाली अंशतः मंजुरीचा आदेश दिला आहे.
या प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालय महागाव यांच्या कामकाजावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोजणी करताना गटवार मोजणी न करता एकाच सर्वे नंबरची मोजणी केल्याचा आरोप असून, शासनाच्या जागा व रस्त्यांच्या जागा ले-आऊटधारकांच्या घशात घालण्यात आल्याचे मुद्दे समोर आले आहेत.
न्यायालयीन मनाई आदेशामुळे आधीच प्लॉट खरेदी केलेले तसेच खरेदी प्रक्रियेत असलेले ग्राहक संभ्रमात पडले असून, फसवणुकीची भीती व्यक्त होत आहे. न्यायालयाचा आदेश असताना प्लॉट विक्री सुरू राहिल्यास ती अवैध ठरू शकते, असा इशारा कायदेतज्ज्ञांनी दिला आहे.
एकनाथ नगरमधील प्लॉट व्यवहारांबाबत अंतिम निर्णय येईपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगून कायदेशीर सल्ला घेऊनच व्यवहार करावा, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.



