महागाव तालुक्यात अवैध वीटभट्ट्यांचा सुळसुळाट; पर्यावरणाला धोका, ई-क्लास व वनजमिनीतील माती उत्खननाचा आरोप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यात परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात वीटभट्ट्या सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. अवैध वीटभट्ट्यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून ई-क्लास तसेच वनजमिनीतील मातीचे खुलेआम उत्खनन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
करंजखेड, आमनी, पिंपरी, मुडाणा, पिंपळगाव, भांब, फुलसावंगी, गुज, हिवरा साई, महागाव व करंजखेड मुडाना,परिसरात परवानगीपेक्षा जास्त वीटभट्ट्या सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे साठवण्यात आले असून ही माती ई-क्लास व वनक्षेत्रातून विनारॉयल्टी आणण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून वीटभट्ट्यांची तपासणी करावी, अवैध उत्खननाची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे महागाव तालुक्यातील महसूल व पर्यावरण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



