पुसद–उमरखेड परिसरात हेल्मेट सक्ती; नियमभंग करणाऱ्यांवर मोठा दंड

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यांमध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर मोटरसायकल चालकांसाठी हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. संबंधित विभागातील टॉपिक इन्चार्ज यांनी याबाबत कडक सूचना दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुसद येथे झालेल्या अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन सुमारे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे उमरखेडमध्ये 30 ते 35 जणांचा मृत्यू झाला असून, महागाव तालुक्यातही अशाच प्रकारच्या अपघातांत अनेकांनी प्राण गमावले आहेत.
या पार्श्वभूमीवर, हेल्मेटशिवाय मोटरसायकल चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांना मोठा दंड आकारला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरेल, हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



