Uncategorized

महागाव तालुक्यात रस्ता कामात गैरव्यवहाराचा आरोप; चौकशीची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील ग्रामपंचायत वनोली (खेडी) येथे रस्ता बांधकामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप समोर आला आहे. गावातील आधीपासूनच चांगल्या स्थितीत असलेला रस्ता तोडून नवीन रस्त्याचे काम करण्यात आले असून, यामध्ये सुमारे १२ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रस्ता हा भिकारी महाराज सती-सामान दादा मार्गाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, बांधकाम उपअभियंता सलामे आणि ग्रामपंचायत सचिव यांच्या संगनमताने जुना रस्ता तोडून नवीन इस्टिमेट तयार करण्यात आले. त्यानंतर निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून निधीचा अपव्यय करण्यात आल्याचा आरोप आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याची गुणवत्ता अत्यंत खराब असून अल्पावधीतच त्यामध्ये दोष दिसून येत आहेत. या प्रकरणात संबंधित लोकप्रतिनिधी—सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य—यांनी मौन बाळगल्यामुळे संशय अधिक गडद होत असल्याचे बोलले जात आहे. माळ पठारावरील अशा अनेक कामांमध्येही बोगसगिरी झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रमेश राठोड यांनी पुढाकार घेत आवाज उठवला असून, संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button