महागाव तालुक्यात जलजीवन योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप; नागरिकांना अद्याप पाण्यापासून वंचित

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सातघरी येथे जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या हर घर नळ योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट असताना, संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचे आरोप आहेत. गावात टाकी व पाईपलाईनचे काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आले असून, आजपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळालेली नाही.
याबाबत उपअभियंता सोनी यांच्या देखरेखीखाली काम होत असताना देखील दर्जाहीन कामकाज झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने काम केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रमेश राठोड यांनी केली असून, संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गावकऱ्यांनीही प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करत, जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच विभागीय मंत्री व स्थानिक आमदारांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन नागरिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



