महागाव पोलिसांची ‘डीजे’वर धडक; गणपतीसह सर्व धार्मिक कार्यक्रमांत कर्कश आवाजाला बंदी

शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार सदानंद वानखेडे यांचे स्पष्ट निर्देश; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणपती उत्सवासह कोणत्याही धार्मिक अथवा सार्वजनिक कार्यक्रमात कर्कश आवाजात डीजे वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. शांतता समितीच्या बैठकीत महागाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार सदानंद वानखेडे यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह धार्मिक कार्यक्रम आयोजकांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले.
“उत्सवाचा आनंद साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. परवानगीशिवाय किंवा नियमांचे उल्लंघन करून डीजे लावल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा ठाणेदार वानखेडे यांनी दिला.
नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत
पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेचे महागाव तालुक्यातील नागरिकांकडून स्वागत होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी तसेच ध्वनीप्रदूषणामुळे त्रास होणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मागील गणपती उत्सवादरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजविण्याबरोबरच मंडळांमध्ये डीजे स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा होती. यावेळी कर्कश आवाजामुळे काही नागरिकांना त्रास झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. त्यामुळे यंदा पोलिस प्रशासनाने सुरुवातीपासूनच डीजेच्या वापराबाबत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
‘उत्सव करा, पण इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या’
धार्मिक उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रम हे आनंदाचे असले तरी त्याचा त्रास इतर नागरिकांना होऊ नये, यासाठी ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्यामुळे उत्सवाच्या उत्साहात ध्वनीप्रदूषण वाढवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
महागाव पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे यंदाच्या गणपती उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



