लखडोबाद चौक ते स्मशानभूमी मार्गावर लोखंडी सळया ठरतायत जीवघेण्या; बायपासवर फुले नगरकडे जाणाऱ्या महिलेचा अपघात!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
हिमायतनगर नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कंत्राटदाराच्या निकृष्ट कामामुळे शहरात ये-जा करणारा मुख्य बायपास मार्ग अपघाताचे केंद्र बनला आहे. लखडोबाद चौक ते स्मशानभूमी मार्गे थेट नांदेड-किनवट रस्त्याकडे जाणारा हा रस्ता शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मुख्य रस्त्यावरून रोज वाहनांची सतत वर्दळ असते. अशा या रस्त्यावर आज स्मशानभूमीजवळ एक अपघात घडला.
रस्त्यातून बाहेर आलेल्या लोखंडी गजात (सळई) स्कूटीचे चाक अडकल्यामुळे आपल्या घराकडे, म्हणजेच फुले नगरकडे जाणाऱ्या एका महिलेचा तोल जाऊन त्या थेट रस्त्यावर पडल्या. कंक्रीट उखडल्यामुळे बाहेर आलेल्या लोखंडी सळया फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. या अपघातात त्या महिलेला मार लागला असून, प्रशासनाच्या अशा हलगर्जीपणामुळे रस्त्यावरून प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
वर्षानुवर्षे टिकणारे रस्ते अवघ्या दोन-चार वर्षांतच उखडून जात आहेत. कंक्रीट गायब होऊन शहराला जोडणाऱ्या या मुख्य बायपासवर थेट लोखंडी सळया वर आल्याचे स्पष्ट दिसत आहे. नगर पंचायतीचे कारभारी आणि अधिकारी या कामांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे नागरिकांनी नगर पंचायतीकडे खालील मागण्या केल्या आहेत:
स्मशानभूमी परिसर व या बायपास मार्गावरील सर्व खड्डे आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळया त्वरित काढून रस्ता नीट दुरुस्त करावा.
दोन-चार वर्षांतच रस्त्याची वाट लावणाऱ्या आणि निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेस नगर पंचायत प्रशासनच जबाबदार असेल.



