महागाव तालुक्यात ग्रामपंचायतीच्या जागेवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप; चौकशीची मागणी

महागाव (प्रतिनिधी संजय नागरगोजे
– महागाव तालुक्यातील कोडगाव येथे ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीजवळील जागेवर बेकायदेशीर ताबा घेतल्याचा गंभीर आरोप करत संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मिका भाऊ राठोड (वय 80) यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, तहसीलदार महागाव व गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, स्मशानभूमीलगत असलेल्या शासकीय जागेवर सुमारे 35 ते 40 वर्षांपासून जनावरांसाठी गोठा बांधून वापर सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित जागा कोणत्याही खासगी व्यक्तीच्या मालकीची नसून गाव नोंदीनुसार सार्वजनिक वापराची असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, ग्रामपंचायत सचिव व इतर संबंधितांनी संगनमत करून कोणताही कायदेशीर आधार नसताना गाव नमुना 8 मध्ये बदल करून सदर जागा दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदाराने पुढे नमूद केले की, संबंधित जागेवर अनेक वर्षांपासून गावातील नागरिक व जनावरे वापर करत असून अचानक झालेल्या नोंदीतील बदलामुळे अन्याय होत आहे. तसेच, वेळेत न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडूनही होत आहे. संबंधित सचिवावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप सरपंचांनी केले आहे.



