शहर

महागाव नगरपंचायतीत ‘विकासपर्व’ सुरू पहिल्याच महिन्यात ७ कोटींच्या कामांना गती; स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि घरकुलांवर भर


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यात सौ. रंजना दीपक आडे यांनी विकासकामांचा धडाका लावत शहराच्या प्रगतीची नवी दिशा निश्चित केली आहे. “सत्ता ही केवळ सेवेचे साधन आहे” या भूमिकेतून त्यांनी कोणतेही राजकारण न करता सर्व नगरसेवक व नागरिकांना सोबत घेत विकासाला प्राधान्य दिले आहे.
७ कोटींचा निधी; विविध योजनांना गती
अध्यक्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महागाव शहरासाठी सुमारे ७ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत दलित व मागासवर्गीय वस्त्यांसाठी २.७० कोटी रुपये मंजूर
स्वच्छ भारत अभियान (घनकचरा व्यवस्थापन) अंतर्गत १.२६ कोटी रुपयांचा निधी
डम्पिंग यार्डकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, वॉल कंपाउंड, तसेच इतर पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद
जलशुद्धीकरण केंद्रावर प्रश्नचिन्ह
प्रभाग क्रमांक १० मधील जलशुद्धीकरण केंद्र गेल्या दहा वर्षांपासून बंद अवस्थेत असताना त्यावर खर्च करण्याच्या प्रस्तावावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. “संरक्षक भिंत उभारून नेमके काय साध्य होणार?” असा सवालही नागरिक करीत असून, हा खर्च निरुपयोगी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठेकेदारावर कारवाईची मागणी
घनकचरा व्यवस्थापनातील ठेकेदाराने योग्य काम न करता अल्प मनुष्यबळावर काम घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही जोर धरत आहे.
स्वच्छतेवर विशेष भर
पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील प्रभाग १ ते १७ मधील साचलेला कचरा साफ करून शहराबाहेर हलवण्यात आला आहे. सध्या सर्व प्रभागांत नाल्यांची स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू असून, “स्वच्छ व सुंदर महागाव” हा संकल्प राबवला जात आहे.
घरकुल लाभार्थ्यांना दिलासा
प्रलंबित घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने निधी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, एकही पात्र कुटुंब वंचित राहू नये यासाठी वाढीव घरकुल प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
प्रशासकीय इमारतीसाठी पाठपुरावा
नगरपंचायतीची स्वतंत्र व सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यासाठीही शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
नेतृत्वाचे मानले आभार
या विकासकामांबाबत बोलताना नगराध्यक्षा सौ. रंजना आडे म्हणाल्या की,
“महागाव शहरासाठी मंजूर झालेला आमदार किसनराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनातून उपलब्ध झाला आहे. त्यांच्या पाठबळामुळे विकास आराखडा प्रत्यक्षात उतरत आहे.”
अल्पावधीतच विकासकामांना गती देत सौ. रंजना आडे यांनी आपली कार्यतत्परता सिद्ध केली असून, महागाव शहर प्रगतीच्या नव्या मार्गावर वेगाने पुढे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button