हिमायतनगर तालुक्यात खळबळ: पळसपूरमध्ये खर्जेलेल्या कुत्र्यांचा हैदोस; दोन चिमुरड्यांसह तिघे जखमी!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी – शेख खय्युम): पळसपूर येथे मोकाट आणि रोगट कुत्र्यांनी पुकारलेल्या दहशतीमुळे संपूर्ण गाव हादरले असून, एकाच दिवशी दोन चिमुरड्यांसह एका व्यक्तीला कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
घटनेचा भीषण वास्तव:
शनिवारी २१ तारखेला ५ वर्षांची शिवन्या योगेश जाधव आणि अवघ्या २ वर्षांचा निरंजन हनुमान गाडगेवा या निष्पाप बालकांवर कुत्र्याने हिंस्त्र हल्ला केला. तसेच श्रीराम चांदराव वानखेडे (वय ४५) यांनाही कुत्र्याने चावा घेऊन रक्तबंबाळ केले. या हल्ल्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रशासकीय निष्क्रियतेचा कळस:
गावात खर्जेलेल्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली असून, त्यांच्यामुळे संसर्गजन्य रोग आणि खाज सुटण्याचे प्रमाण वाढत आहे. असे असतानाही सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. सार्वजनिक आरोग्य धोक्यात असताना प्रशासन अद्याप कोणतीही ठोस कारवाई करायला तयार नाही.
तात्काळ कारवाईची मागणी:
मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि पाळीव कुत्रे असलेल्या मालकांवर कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी पळसपूरच्या सुज्ञ नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.



