Uncategorized

महागाव नगरपंचायत : प्रभाग १२, १३ व १४ मधील सिमेंट रस्त्यांचे काम निकृष्ट; नगरसेवकांची बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ मधील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा गंभीर आरोप करत संबंधित प्रभागांतील नगरसेवकांनी बांधकाम विभाग, उपविभाग महागाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
नगरसेवक सुरेश नरवाडे, जयश्री संजय नरवाडे तसेच प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ मधील अन्य लोकप्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारीनुसार संजय कदम ते ससाने यांच्या घरापर्यंतचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा करण्यात येत असून, कामात वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत कमी प्रमाणात व दर्जाहीन असल्याचे निदर्शनास आले आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार आवश्यक असलेली गिट्टी न टाकता केवळ गोटे टाकून थातूरमातूर पद्धतीने काम केले जात आहे. हा रस्ता शाळेतील विद्यार्थ्यांसह जड वाहनांच्या नियमित वाहतुकीचा असल्याने, भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली आहे. तसेच, प्रत्यक्षात हे काम डमी ठेकेदारामार्फत होत असल्याचे निदर्शनास आले असून, यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय, सदर रस्त्याच्या कामाची स्वतंत्र चौकशी करून क्वालिटी कंट्रोल कार्यालयामार्फत गुणवत्ता चाचणी (Quality Control Test) करावी, व त्यानंतरच देयके अदा करण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.
तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा पुढील टप्प्यात आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेवक व नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button