नवीन रेल्वे फलकावरून उर्दू नाव वगळल्याने हिमायतनगरकरांमध्ये तीव्र संताप; कंत्राटदारावर गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाईची मागणी

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): येथील ऐतिहासिक रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीवरील मुख्य फलकावरून अनेक वर्षांपासून असलेले उर्दू भाषेतील ‘हिमायतनगर’ हे नाव अचानक हटवण्यात आल्यामुळे समस्त हिमायतनगरच्या नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असंतोष व्यक्त होत आहे. मुदखेड-आदिलाबाद रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यापासून, म्हणजेच गेल्या दोन अडिच दशकोंहून अधिक काळापासून हे नाव अधिकृतपणे तीनही भाषांमध्ये अस्तित्वात आहे. “आम्ही स्थानिक आमदार आणि खासदारांना निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून रेल्वे प्रशासनाकडे त्वरित पाठपुरावा करावा आणि उर्दू नाव पूर्ववत करून द्यावे,” अशी जाहीर अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.
भारतीय संविधानाचे कलम ३४७ हे स्पष्टपणे एखाद्या विशिष्ट भागातील मोठ्या लोकसंख्येच्या भाषिक हक्कांचे आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करते. असे असताना, रेल्वेच्या मूळ मंजूर आराखड्यात (Sanctioned Layout) समाविष्ट असलेले अधिकृत नाव कोणतीही कायदेशीर मंजुरी नसताना परस्पर हटवण्याचा अधिकार कंत्राटदाराला संविधानाने किंवा रेल्वे नियमाने दिलेला नाही. कंत्राटदाराने केलेले हे कृत्य भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) च्या कलम ३२४ (सरकारी मालमत्तेचे नुकसान) आणि रेल्वे अधिनियम, १९८९ च्या कलम १४५ व १४७ (सार्वजनिक मालमत्तेत अनधिकृत बदल करणे) अंतर्गत अत्यंत गंभीर, अजामीनपात्र आणि अक्षम्य स्वरूपाचा गुन्हा ठरतो.
कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय सरकारी मालमत्तेवरील भाषिक बोर्डात छेडछाड करणे हा थेट प्रशासकीय द्रोह आहे. कायद्याच्या चौकटीत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास संबंधित गुत्तेदाराचे रेल्वे लायसन्स रद्द होऊन त्याच्या पायाखालची जमीन सरेल आणि त्याला कायमचे काळ्या यादीत (Blacklist) टाकले जाईल, इतकी कडक तरतूद कायद्यात आहे. या मनमानी कृत्यामुळे स्थानिक जनतेच्या भाषिक भावना दुखावल्या गेल्या असून शहरातील सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला आहे. तरी रेल्वे प्रशासनाने आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी (DRM) या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित गुत्तेदारावर त्वरित गुन्हा (FIR) दाखल करावा आणि संविधानाच्या चौकटीत राहून मराठी व हिंदीसोबत उर्दू भाषेतील ‘हिमायतनगर’ हे नाव पुन्हा फलकावर सन्मानाने व पूर्ववत लावावे, अशी आग्रही मागणी हिमायतनगरच्या समस्त रहिवाशाщих वतीने करण्यात येत आहे.



