Uncategorized

काळी दौलतमध्ये अतिक्रमणाचा विळखा; बसथांबा गुदमरला, प्रवाशांचे हाल—तातडीने कारवाईची मागणी मंत्री महोदय समक्ष सोडतील का?


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील काळी दौलत येथील मुख्य बाजारपेठ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून रहदारी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ४० ते ४५ गावांसाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या या बाजारपेठेत दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना रस्त्यावरच झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे एसटी महामंडळाच्या बसथांब्यालाही अतिक्रमणाचा फटका बसला आहे. बस थांबण्याच्या जागेवरच अतिक्रमण झाल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा उपलब्ध नाही. परिणामी शाळकरी मुली, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उन्हात- पावसात उभे राहून बसची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
काळी दौलत ही वाढत्या व्यापारी उलाढालीमुळे भविष्यात तालुक्याचे केंद्र होऊ शकणारी बाजारपेठ मानली जाते. मात्र सध्याच्या अतिक्रमणामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर हातगाडे, ठेले आणि अनधिकृत बांधकामांमुळे वाहतुकीसाठी जागाच उरलेली नाही.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीने रस्त्यावरचे हातगाडे व अनधिकृत अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करावेत, तसेच एसटी महामंडळाने आपल्या बसथांब्याच्या जागेवरील अतिक्रमण दूर करून प्रवाशांसाठी बसण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, हा परिसर पुसद मतदारसंघाशी संबंधित असून मंत्री इंद्रनील नाईक यांचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्यात आले आहे. नागरिकांनी त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून अतिक्रमणमुक्त रस्ते व सुस्थितीत बसथांबा उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
काळी दौलतमधील वाढती समस्या लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button