शहर

विचारवंत, भिक्खू संघ आणि नामवंत कलाकारांची मांदियाळी दोन्ही दिवस शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महागाव यांच्या वतीने आयोजित दहाव्या भव्य बौद्ध धम्म परिषदेचे बिगुल वाजले असून महागाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा दोन दिवसीय ऐतिहासिक धम्म सोहळा संपन्न होणार आहे.
आयोजकांकडून धम्मबांधवांना दोन्ही दिवस शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नामवंत विचारवंत व भिक्खू संघाची उपस्थिती
देशपातळीवरील विचारवंत, भिक्खू संघ, प्रबोधनकार तसेच सुप्रसिद्ध गायक-कलावंतांच्या उपस्थितीमुळे यंदाची परिषद विशेष ठरणार आहे. धम्म, समता, बंधुता आणि प्रबोधनाचा संदेश समाजमनात रुजविण्याच्या उद्देशाने विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत धम्मध्वजारोहण, शीलग्रहण व उद्घाटन सोहळा होईल. धम्मध्वजारोहण भदंत सुबोध स्थविर यांच्या हस्ते तर उद्घाटन भदंत अश्वजित स्थविर करतील. मोर्शी (अमरावती) येथील भदंत कौंडण्य स्थविर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
हिंगोलीचे खासदार मा. नागेश पाटील आष्टीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष मा. साहेबराव कांबळे तर स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे (दराटीकर) मार्गदर्शन करणार आहेत.
धम्मदेशना व व्याख्यानमाला
शनिवारी दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत भिक्खू संघाकडून धम्मदेशना होणार असून त्रिशरण, पंचशील आणि बुद्धांच्या धम्मतत्त्वांवर सखोल मार्गदर्शन केले जाईल. समाजातील नैतिक मूल्यांची जपणूक, तरुणाईचे प्रबोधन आणि समतामूल्यांची जोपासना यावर विशेष भर दिला जाणार आहे.
रविवारी सकाळी शीलग्रहण व धम्मदेशना झाल्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्रात प्रा. डॉ. अनिल काळबांडे (उमरखेड), ॲड. महादेव कांबळे (सांगोला) आणि आंतरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार कुमारी प्रिया नप्ते विचार मांडणार आहेत. भारतीय राज्यघटना, सामाजिक न्याय, बौद्ध तत्त्वज्ञान आणि आधुनिक काळातील धम्माची गरज या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
भीम-बुद्ध गीतांचा महासंग्राम – मुख्य आकर्षण
शनिवारी रात्री ७ ते १० या वेळेत अजय दहाडे, अंजली गडपाले, निशाताई घोंगडे, भाग्यश्री इंगळे आणि वसंत आडे यांच्या आवाजात ‘भीम व बुद्ध गीतांचा महासंग्राम’ रंगणार आहे.
रविवारी रात्री अशोक निकालजे (मुंबई), भीमेश भारती (नागपूर), संविधान मनोहर, मनोजराजा गोस्वामी आणि राजेश वाटोरे यांच्या गीतांनी परिषदेची भव्य सांगता होईल.
जय्यत तयारी
या ऐतिहासिक धम्म सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आयोजक सागर दादा पाईकराव यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परिसरात ठिकठिकाणी फलक, बॅनर आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात येत असून धम्मप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महागाव व परिसरातील जास्तीत जास्त धम्मप्रेमींनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button