शहर

महागाव नगरपंचायत : अध्यक्षांचा पहिल्याच दिवशी ‘हजेरी’ प्रयोग चर्चेत प्रशासकीय शिस्त की अनुभवाचा अभाव?


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी २७ फेब्रुवारी २०26 रोजी विराजमान झालेल्या रंजना दीपक आडे (भारतीय जनता पार्टी) यांनी दिनांक २ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.५० वाजता कार्यालयात उपस्थिती लावली. पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी त्यांनी कर्मचारी उपस्थिती रजिस्टर ताब्यात घेत बाहेर खुर्ची टाकून बसल्याने नगरपंचायत वर्तुळात चर्चा रंगली आहे.
कार्यालयीन शिस्तीचा प्रश्न
नगरपंचायतीत कर्मचारी उपस्थिती रजिस्टर कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे असते आणि येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यावर स्वाक्षरी करून हजेरी लावणे बंधनकारक असते. कार्यालयाचा अधिकृत वेळ साडेदहा वाजता असताना, अध्यक्षांनी १०-१० मिनिटांनी रजिस्टर तपासणे व स्वतः बाहेर बसून हजेरीवर लक्ष ठेवणे योग्य पद्धत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काहींच्या मते, कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न असू शकतो; तर काहींना हे अनुभवाच्या अभावाचे लक्षण वाटत आहे. अध्यक्षांना कार्यालयात मानाचे स्थान आणि स्वतंत्र नियोजित कक्ष उपलब्ध असताना ही परिस्थिती का निर्माण झाली, याबाबत आत्मचिंतनाची गरज व्यक्त होत आहे.
पारदर्शकतेसाठी तांत्रिक उपायांची गरज
नगरपंचायतीत पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी बायोमेट्रिक ‘थंब’ प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे यासारखे उपाय प्रभावी ठरू शकतात. यामुळे उपस्थिती व्यवस्थापन अधिक पारदर्शक होईल आणि वादांना पूर्णविराम मिळू शकतो.
कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची प्रतीक्षा
महागाव नगरपंचायत येथे कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती अद्याप झालेली नाही, ही बाब गंभीर मानली जात आहे. स्थिर प्रशासकीय नेतृत्व नसल्याने अनेक निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा आहे.
स्थानिक पातळीवर भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना देखील कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्यात विलंब का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासन मजबूत करण्यासाठी सर्वप्रथम सक्षम व कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नगरपंचायतीत शिस्त आणि विकास या दोन्ही बाबींसाठी प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. पहिल्या दिवसाच्या या घटनेनंतर अध्यक्ष कोणती पुढील रणनीती आखतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button