Uncategorized

महागाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर दलालांचे जाळे सक्रिय? युनियन बँक शाखांमध्ये संशयास्पद व्यवहारांची चर्चा; चौकशीची मागणी


महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया सुरू असताना, युनियन बँक ऑफ इंडियाच्या महागाव व मुडाणा शाखांमध्ये काही दलालांमार्फत संशयास्पद व्यवहार होत असल्याची चर्चा शेतकरी वर्गात रंगली आहे. यामुळे बरेच शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहण्याची शक्यता वर्तुळी जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘जुन्याचे नवे’ कर्ज – कमिशनचा आरोप
स्थानिक पातळीवर समोर आलेल्या माहितीनुसार, काही दलाल शेतकऱ्यांकडून सुमारे १० टक्के कमिशन घेऊन त्यांचे जुने कर्ज स्वतः बँकेत भरत आहेत. त्यानंतर संबंधित कर्जावर १५ ते २० टक्के वाढीव नवीन कर्ज मंजूर करून घेतल्याचा आरोप केला जात आहे.
यामुळे कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याऐवजी काही शेतकरी नव्याने कर्जबाजारी होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजची मागणी
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बँक शाखांमध्ये दररोज काही विशिष्ट व्यक्ती येऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणे, पासबुक व्यवहार करणे, एटीएमद्वारे रक्कम काढणे असे व्यवहार करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
या फुटेजची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक की गैरसमज?
कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यांना ‘जुनं कर्ज भरून नवं कर्ज घ्या’ असा सल्ला देण्यात येत असल्याची चर्चा आहे. जर हे खरे असेल, तर कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे.
प्रशासनाकडे कारवाईची मागणी
जिल्हाधिकारी तसेच बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने:
संबंधित व्यवहारांची चौकशी करावी
सीसीटीव्ही फुटेज तपासावे
शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या दलालांवर कारवाई करावी
कर्जमाफी प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात
अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अधिकृत भूमिका काय?
या प्रकरणात संबंधित बँक अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
शेतकरी हिताच्या दृष्टीने पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button