१६ पदे रिक्त; महागाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ‘रामभरोसे’
आमदार किसन वानखडे यांना परिस्थितीची माहिती आहे का? नागरिकांचा सवाल; तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव येथील ग्रामीण रुग्णालय सुरू होऊनही आवश्यक मनुष्यबळाअभावी आरोग्यसेवेचा कारभार अक्षरशः ‘रामभरोसे’ सुरू असल्याचे चित्र आहे. ग्रामीण रुग्णालयातील तब्बल १६ पदे आजपर्यंत रिक्त असल्याने नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखडे हे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असताना त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयात इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त का आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाच्या माध्यमातून आरोग्य सुविधांसाठी विविध योजना राबविल्या जात असताना प्रत्यक्ष ग्रामीण भागातील रुग्णालयात आवश्यक कर्मचारीच उपलब्ध नसतील तर नागरिकांना त्याचा लाभ कसा मिळणार, असा सवालही नागरिक करीत आहेत.
महागाव ग्रामीण रुग्णालयात डिलिव्हरीसाठी दररोज गर्भवती महिला येत असतात. मात्र आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळाचा अभाव असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रुग्णालयात चालकाचे पदही उपलब्ध नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी महागाव ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या वेळी दहा ते अकरा जणांनी डॉक्टरांशी गैरवर्तन व मारहाण केल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात उमटले. डॉक्टरांनी आंदोलन केले तसेच काम बंद आंदोलनही करण्यात आले. एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही आमदार किसन वानखडे यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी का केली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण रुग्णालयातील पीएससी कर्मचाऱ्यांवरही कामाचा अतिरिक्त ताण असल्याचे चित्र दिसून येत आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर रुग्णालयाचा कारभार सुरू असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा भार पडत आहे.
आरोग्यसेवा ही नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. त्यामुळे आमदार किसन वानखडे यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून ग्रामीण रुग्णालयातील १६ रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, तसेच आवश्यक डॉक्टर, कर्मचारी, चालक आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



