हिवरा येथे बायपासचे काम न झाल्यास १० फेब्रुवारीला तुळजापूर–नागपूर महामार्गावर रस्ता रोकोचा इशारा

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
तुळजापूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हिवरा गावाजवळील बायपास रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले असून त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.
बायपासचे काम तात्काळ सुरू न केल्यास दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी तुळजापूर–नागपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार हिवरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद पाटील, राजू धोतरकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल कदम, संदीप कमल, अमोल वानखेडे व कामारकर यांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भात संबंधितांनी ठाणेदार धनराज निळे यांना लेखी निवेदन देऊन आंदोलनाबाबत पूर्वसूचना दिली आहे. हिवरा परिसरातील बायपास रस्ता रखडल्यामुळे अवजड वाहतूक थेट गावातून जात असून अपघातांचा धोका वाढला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे) या गंभीर विषयाची दखल घेऊन बायपास रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा नियोजित तारखेला आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.



