महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती गुलाब लोभा जाधव यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर 15 मतांनी ठराव पारित; तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे भारतीय जनता पार्टीचे सभापती गुलाब लोभा जाधव यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव 15 मतांनी मंजूर झाल्याने महागाव तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या निकालामुळे सहकार क्षेत्रात भाजपला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
उंबरखेड–महागाव मतदारसंघाचे आमदार किसन वानखडे तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या उपस्थितीत गुलाब लोभा जाधव यांना यापूर्वी सभापतीपदावर विराजमान करण्यात आले होते. मात्र त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हिताचे ठोस व परिणामकारक निर्णय न झाल्याचा आरोप संचालकांकडून करण्यात आला.
नितीन भुतडा यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 100 दुकाने असलेले व्यापारी कॉम्प्लेक्स उभारण्याचे जाहीर आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने व्यापारी व संचालकांमध्ये नाराजी वाढली. याच पार्श्वभूमीवर संचालकांनी अविश्वास ठराव दाखल करून सभापतींना पदावरून पायउतार केले.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी बाजी मारल्याचे चित्र असून, महागाव तालुक्यातील सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः अजित पवार गट आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठे यश संपादन करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 35 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते विजय महाजन हे व्यापारी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. एवढा प्रदीर्घ अनुभव असलेले नेते सभागृहात असतानाही सभापतींनी त्यांचा सल्ला का घेतला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच मुरब्बी नेते पंजाबराव खडकेकर, शिवाजी राठोड व दौलतराव नाईक यांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष केल्याने आणि काही नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने गुलाब जाधव यांची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.
महागाव मतदारसंघात माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या राजकीय सल्ल्याला आजही मोठे महत्त्व असून, त्यांच्या भूमिकेच्या विरोधात गेल्याने गुलाब जाधव यांना अखेर पदावरून पायउतार व्हावे लागल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सहकार्याने शिवाजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रतिनिधी म्हणून संचालक निवडले जातील, अशीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे महागाव तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
या सर्व घडामोडींमधून केवळ आश्वासनांवर किंवा व्यक्तिकेंद्रित राजकारणावर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या हिताचे ठोस निर्णय घेणाऱ्या आणि तालुक्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या नेतृत्वालाच संधी देण्याचा स्पष्ट संदेश मतदारांनी दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.



