शहर

“एमएलसीच्या मतांसाठी कोट्यवधींचा बाजार?” — उमरखेडमध्ये संतापाची लाट; जनतेच्या मतांचा सौदा करणाऱ्यांना नागरिकांचा इशारा!


मुख्य संपादक

उमरखेड :-विधानपरिषदेच्या प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून उमरखेड शहरात मात्र वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसकडून साहेबराव कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, भाजपाकडून नितीन भुतडा यांचे नाव चर्चेत, तर शिवसेनेत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात एकूण ४४६ मतदार असून त्यात नगरपरिषद व नगरपंचायतीतील निवडून आलेले सदस्य आणि स्वीकृत नगरसेवकांचा समावेश आहे. उमरखेड नगरपरिषदेत ३० सदस्य असल्याने येथे प्रत्येक मताला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या निवडणुकीपेक्षा शहरात सध्या एका वेगळ्याच चर्चेने खळबळ उडवली आहे.

“एका मताला १५ ते २० लाख?” — शहरात चर्चांचा स्फोट

उमरखेडमध्ये नागरिकांमध्ये उघडपणे चर्चा सुरू आहे की, एमएलसी निवडणुकीत मतदानासाठी लाखोंची ऑफर दिली जाणार किंवा घेतली जाणार! “एका मतासाठी १५ ते २० लाख रुपये मिळणार” अशी चर्चा शहराच्या चौकाचौकात रंगत असल्याने सामान्य नागरिक संतप्त झाले आहेत.

जनतेचा प्रश्न आहे —
नगरसेवकांना आम्ही विकासकामांसाठी निवडून दिले की मतांचा सौदा करण्यासाठी?

जनतेच्या प्रश्नांकडे पाठ, पैशांच्या राजकारणाकडे धाव!

उमरखेड शहरात नालीसफाई, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, स्वच्छता अशा मूलभूत समस्या गंभीर बनल्या आहेत. अनेक वार्डांमध्ये नागरिक त्रस्त आहेत. मात्र जनतेचे म्हणणे असे की, निवडून आलेले अनेक नगरसेवक वार्डात फिरकायलाही तयार नाहीत.

विकासकामांचा पाठपुरावा करण्याऐवजी “कोणत्या कामातून किती कमिशन?” आणि “कोणाकडून किती फायदा?” यावरच नगरपरिषद सभागृहात चर्चा आणि भांडणे सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

नगरपरिषदेत लोकशाही की दादागिरी?

उमरखेड नगरपरिषदेत काही लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर दबाव, दादागिरी आणि धमकावण्याच्या प्रकारांबाबतही शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याऐवजी फक्त सत्ता, ठेके आणि पैशांच्या राजकारणात काही जण व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

जनतेचा थेट सवाल

“ज्या जनतेच्या मतांवर निवडून आलात, त्याच जनतेला विसरून आता मतांचा बाजार मांडणार का?”
“वॉर्डातील समस्या सोडविण्यापेक्षा पैशांचे राजकारण महत्त्वाचे झाले आहे का?”

असे थेट सवाल आता नागरिक नगरसेवकांना विचारू लागले आहेत.

एमएलसी निवडणुकीच्या निमित्ताने उमरखेडमध्ये सुरू असलेल्या चर्चांनी स्थानिक राजकारणातील वास्तव पुन्हा एकदा समोर आणले असून, आता जनता फक्त आश्वासन नव्हे तर काम आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा व्यक्त करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button