हिमायत नगर: लोकनेते अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहताना नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबुब, नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक.

हिमायत नगरमध्ये ‘लोकनेते’ अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली; शहरात शोककळा
हिमायत नगर (ता प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी):
महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते अजित दादा पवार यांच्या निधनामुळे हिमायत नगर शहरात सर्वत्र शोककळा पसरली असून, शहरात कडकडीत शांतता पाळण्यात येत आहे. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर हिमायत नगर नगरपंचायतीच्या वतीने विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबुब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी अजित दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष शेख रफीक म्हणाले की, “महाराष्ट्राने आज एक अत्यंत कार्यक्षम, अभ्यासू आणि धडाडीचा लोकनेता गमावला आहे. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि विकासाची दृष्टी यामुळे त्यांनी राज्यावर आपली वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.”
या श्रद्धांजली प्रसंगी नगरसेवक, शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.



