घारापूर रेतीघाटावर महसूल अधिकाऱ्याचा संशयास्पद ‘उपद्व्याप’; रेती तस्करांशी साटेलोट्याची चर्चा

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील घारापूर (धारापूर) रेतीघाटावर महसूल विभागातील एका अधिकाऱ्याचा संशयास्पद प्रकार समोर आल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेती तस्करी रोखण्याची जबाबदारी असलेले अधिकारीच “शिकारीसाठी” रेतीघाटावर पोहोचल्याची चर्चा तालुकाभर रंगू लागली आहे.
तालुक्यातील पैनगंगा नदीवरील रेतीघाटांचे लिलाव झाले असले, तरी संबंधित कंत्राटदारांना अद्याप अधिकृत परवानगी न मिळाल्यामुळे या संधीचा रेती तस्कर खुलेआम गैरफायदा घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नदीपात्रात रेती उत्खनन करणाऱ्या वाहनांचे थवेच्या थवे सर्रास धावू लागले असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.
अशातच दि. १९ जानेवारी रोजी उमरखेड तहसीलचे एक महसूल अधिकारी आपल्या सेवकांसह घारापूर रेतीघाटावर दाखल झाले. त्यावेळी तेथे पाच ते सहा रेती उत्खनन करणारी वाहने उपस्थित असल्याचे सांगितले जाते. कारवाईच्या नावाखाली रेती तस्करांचा पाठलाग करताना संबंधित अधिकाऱ्याचा पाय घसरून मोबाईल थेट नदीच्या पाण्यात पडल्याची घटना घडली.
मात्र, मोबाईल गमावला तरीही ‘शिकार हाती लागली’ आणि एका पेटीवर समाधान मानण्यात आल्याची कुजबुज रेती तस्करांच्या वर्तुळात सुरू आहे. याबाबत सध्या ठोस पुरावा उपलब्ध नसला, तरी पैनगंगा खोऱ्यात महसूल अधिकारी व रेती तस्करांमधील साटेलोट्याची खमंग चर्चा जोर धरू लागली आहे.
दरम्यान, रेती तस्करीवर कठोर कारवाई करण्याऐवजी अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याने, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा पैनगंगा नदीपात्रातील बेकायदेशीर रेती उत्खनन असेच बिनधास्त सुरू राहील, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.



