तिवरंग येथे शॉर्टसर्किटमुळे ४ एकर ऊस जळून खाक; दोन शेतकऱ्यांचे सुमारे ७ लाखांचे नुकसान

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड:-
उमरखेड तालुक्यातील तिवरंग गावात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून दोन शेतकऱ्यांचा सुमारे चार एकर ऊस जळून खाक झाल्याची गंभीर घटना शुक्रवारी दि. १९ जानेवारी रोजी दुपारी घडली. या आगीत अंदाजे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.
तिवरंग येथील शेतकरी महावीर रामराव कदम (शेत सर्वे नं. २५/अ – १ एकर) व प्रतापराव रामराव कदम (शेत सर्वे नं. २५/१ – ३ एकर) यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांचा एकमेकांना घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्या. त्याच वेळी वाऱ्याचा वेग वाढल्याने तोडणीला आलेल्या ऊस पिकाने पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.
या आगीत चार एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला, तसेच स्प्रिंकलर सेटसह इतर शेती साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. संबंधित ऊस पिकाची लागवड ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली होती आणि तो ऊस तोडणीच्या अगदी तोंडावर असतानाच जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतातून गेलेले विद्युत पोल व तारा अनेक दिवसांपासून लोंबकळत होत्या. याबाबत महावितरण (MSEB) कार्यालयास यापूर्वी लेखी तक्रार देऊनही योग्य दुरुस्ती करण्यात आली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ग्रामीण भागातील शेतीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. संबंधित विभागाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा करून नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.



