मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मुडाणा–वडत रस्त्याचे काम निकृष्ट; ३.८६ कोटींच्या कामात ठेकेदा

रावर गंभीर आरोप
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मुडाणा ते वडत या रस्त्याच्या सुधारणेसाठी ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुमारे ३.४ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम १५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणे अपेक्षित होते, मात्र ठरलेल्या तारखेला काम सुरू न करता आता १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत असताना घाईघाईने व थातूरमातूर पद्धतीने काम केले जात असल्याचे चित्र समोर येत आहे.
हे काम टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड, पुणे या ठेकेदार कंपनीला देण्यात आले असून, यवतमाळ येथील कार्यकारी अभियंता (मग्रारवी संस्था) यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने या प्रकल्पास अर्थसहाय्य मंजूर केले आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इस्टिमेटनुसार रस्ता तयार करताना जुना रस्ता पूर्णपणे खोदून नव्याने मजबुतीकरण करणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात जुन्या रस्त्यावरील खड्डे बुजवून वरवर डांबरीकरण केले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे हा रस्ता फार काळ टिकणार नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
या संपूर्ण प्रकारामागे अधिकारी व ठेकेदार यांच्यातील संगनमताने भ्रष्टाचार सुरू असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. “काम जर २०२४ मध्ये नियोजनाप्रमाणे सुरू झाले असते, तर दर्जेदार काम करणे ठेकेदाराला भाग पडले असते,” अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
वडत येथील नागरिकांनी दर्जेदार व इस्टिमेटप्रमाणे रस्ता बांधण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच संबंधित आमदारांनी या कामाकडे लक्ष देऊन स्वतः पाहणी करावी, क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत चौकशी करूनच ठेकेदाराचे बिल अदा करण्यात यावे, अशी स्पष्ट मागणी नागरिकांनी केली आहे.



