फुलसांगवी–महागाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; कोट्यवधींच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
फुलसांगवी ते महागाव या डांबरी रस्त्यावरील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप होत असून, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यातील संगनमताने हा रस्ता तयार करण्यात आला, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. जागोजाग मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ३० ते ३५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती असून, ठेकेदार जयंत चिद्दरवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून एकाच वर्षात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले, असा आरोप होत आहे. काम पूर्ण होऊन अवघ्या काही महिन्यांतच रस्ता उखडू लागल्याने भ्रष्टाचार उघड झाला आहे.
या प्रकरणी जगदीश नरवाडे यांनी तक्रारी केल्या असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. तसेच महागाव मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनीही या कामाची साधी चौकशी न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
व्यापारी पेठ असलेल्या फुलसांगवी परिसरातून महागाव–किनवट मार्गे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा महत्त्वाच्या मार्गावर ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार करून रस्त्याची अक्षरशः चाळणी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या कामाची तत्काळ चौकशी करून ठेकेदाराला देयके (बिले) अदा करू नयेत, तसेच इस्टिमेटप्रमाणे पारदर्शक व दर्जेदार काम करून घ्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“आमदार या कामाची चौकशी करणार का?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



