विकासाच्या नावावर सत्तेचा खेळ रंगला, पण हिमायतनगर परगण्याला काय मिळाले? आमदार-खासदार शिंदे गटात अन् सभागृहात मौन; नगर पंचायतीला निधी मिळेना, उपजिल्हा रुग्णालयाची दुरवस्था अन् पाणी, रस्ते, नाल्यांच्या प्रश्नांवरून नागरिकांचा तीव्र उद्रेक!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
आमदार शिंदे गटातून निवडून आले आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही विकासाच्या नावाखाली शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, आमदार-खासदार दोघेही सत्ताधारी पक्षात असताना ऐतिहासिक ओळख असलेल्या हिमायतनगर परगण्याच्या नशिबी उपेक्षाच आली आहे. या परगण्याच्या विकासासाठी आणि आरोग्य-पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर या लोकप्रतिनिधींनी कधीही विधानसभा किंवा लोकसभेत आवाज उठवला नाही, असा थेट आरोप आता नागरिक करत आहेत.
शहरातील सरकारी दवाखान्याला ‘उपजिल्हा रुग्णालय’ असा मोठा दर्जा देण्यात आला खरा, पण प्रत्यक्षात येथे पुरेशा वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा आहे. आरोग्य व्यवस्थेचे हे तीन तेरा वाजलेले असताना सत्ताधारी आमदार आणि खासदार या रुग्णालयाकडे कधी गांभीर्याने पाहणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दुसरीकडे, हिमायतनगर नगर पंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने राज्य सरकार आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी या परगण्यातील नगर पंचायतीला हक्काचा निधी देणार की राजकीय भेदाभेद करणार, असा रोखठोक सवाल उपस्थित होत आहे. आज शहराच्या गल्लीबोळांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सांडपाण्याच्या तुंबलेल्या नाल्या आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे नगर पंचायतीला पुरेसे बजेट मिळत नसून विकासाचा गाडा पूर्णपणे ठप्प झाला आहे.
नागरिकांची आक्रमक मागणी:
लोकप्रतिनिधींनी सभागृहात मौन सोडत राजकीय मतभेद बाजूला ठेवावेत! उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि हिमायतनगर नगर पंचायतीसाठी विशेष बजेट मंजूर करून गल्लीबोळांतील पाणी, रस्ते व नाल्यांची कामे तातडीने सुरू करावीत.



