शहर

महागाव शहरात डासांचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात फॉगिंग, औषध फवारणी व विशेष स्वच्छता मोहीम तातडीने राबवा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा – शैलेश कोपरकर


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून शहरातील बहुतांश भागात डासांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक तथा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश दिलीपराव कोपरकर यांनी नगरपंचायतीने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
कोपरकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शहरातील अनेक वॉर्डांमध्ये नाले, गटारी व सांडपाण्याचे निचरा मार्ग अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेले नाहीत. विविध ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसरामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाकडून नियमित फॉगिंग, डासांच्या अळ्यांचा नाश करण्यासाठी औषध फवारणी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
संध्याकाळनंतर शहरातील अनेक भागांत डासांचा प्रचंड उपद्रव होत असून नागरिकांना घराबाहेर बसणेही कठीण झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. डासांपासून बचावासाठी नागरिकांना मच्छरदाणी, कॉईल, लिक्विड मशीन व स्प्रे यावर अतिरिक्त खर्च करावा लागत असला, तरीही अपेक्षित दिलासा मिळत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याबाबत शैलेश कोपरकर म्हणाले, “नगरपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे अक्षम्य आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रभावी उपाययोजना होत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात तातडीने फॉगिंग मोहीम राबवून औषध फवारणी करावी, नाले-गटारींची विशेष स्वच्छता करावी आणि साचलेले पाणी त्वरित हटवावे.”
ते पुढे म्हणाले, “नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. नगरपंचायतीने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.”
महागाव शहरातील नागरिकांनीही आरोग्य विभाग आणि नगरपंचायतीने केवळ कागदोपत्री कामे न करता प्रत्यक्षात व्यापक स्वच्छता मोहीम, नियमित फॉगिंग आणि औषध फवारणी राबवून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवावे, अशी मागणी केली आहे. साथीच्या आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button