अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसचे उद्या तहसील कार्यालयावर निवेदन

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात दिनांक ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत जाहीर करावी, या मागणीसाठी महागाव तालुका काँग्रेस कमिटी, महागाव शहर काँग्रेस कमिटी, महागाव तालुका युवक काँग्रेस आणि महागाव शहर महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, महागाव येथे आंदोलन करून मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या निवेदनाद्वारे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनात महागाव तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



