यवतमाळ-वाशिमच्या शेतकरी व घरकुल प्रश्नांसाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा; पिक विम्याबाबत सकारात्मक आश्वासन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ-वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसह प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांच्या प्रश्नांसाठी खासदार संजय भाऊ देशमुख यांनी ३१ जुलै रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी २०२५-२६ या वर्षातील पिक विमा मदतीतून यवतमाळ जिल्ह्याचा समावेश न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. खरीप हंगामात अतिवृष्टी, अनियमित पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही जिल्ह्याला मदत न मिळणे अन्यायकारक असल्याचे खासदार देशमुख यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात ₹१,२९२ कोटींची मदत जाहीर केली असली, तरी त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वाशिम जिल्ह्यातही अनेक भागांचे नुकसान होऊनही केवळ एका मंडळाचा पिक विमा योजनेत समावेश करण्यात आल्याने सर्व बाधित भागांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.
CCE (Crop Cutting Experiment) या पद्धतीवर अतिवलंबून राहिल्यामुळे प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. प्रत्यक्ष पंचनामे आणि वस्तुस्थितीच्या आधारे निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
यावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्या असून, सर्व बाबींची तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त होताच यवतमाळ जिल्ह्याच्या पिक विम्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
याचवेळी प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेच्या टप्पा २ व ३ मधील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित निधी तातडीने वितरित करण्याची मागणीही करण्यात आली.
दरम्यान, शेंबाळपिंपरी, ईसापूर धरण परिसर, हिवळी, पालमपट, देवगव्हाण, जुने-नवे जगापूर, गौळ (बु.), दगड धानोरा, आमदरी व परिसरातील गावांमधील घरकुल योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांच्या प्रश्नांची माहिती मतीन पहिलवान, इमरान खान पठाण आणि हकीम सिद्दिकी यांनी सातत्याने खासदार संजय भाऊ देशमुख यांच्यापर्यंत पोहोचविल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



