घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू केव्हा? महागाव तहसीलदार अभय मस्के यांच्याकडे नागरिकांचा सवाल

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र ही घोषणा आजही कागदावरच मर्यादित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट घोषणा करूनही महागाव तालुक्यातील घरकुल लाभार्थी अद्याप वाळूपासून वंचित आहेत.
महागाव तहसील अंतर्गत जप्त करण्यात आलेली वाळूसुद्धा घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. तालुक्यात ११ ते १२ हजार घरकुल मंजूर असून, वाळू उपलब्ध नसल्यामुळे अनेक घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत थांबलेली आहेत.
एकीकडे शासनाकडून “घरकुल पूर्ण करा” असा दबाव, तर दुसरीकडे वाळूच उपलब्ध नसल्याने लाभार्थी हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे परिसरातील नदीपात्रात जागोजागी वाळूचे मोठमोठे ढिग पडलेले असतानाही, ती वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात नाही.
स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, सरास अवैध वाळू वाहतूक मात्र ‘हप्त्यांवर’ सुरू आहे, पण गरजू घरकुल लाभार्थ्यांना मात्र वाळू नाकारली जात आहे. हे दृश्य महागाव तालुक्यातील मोठी शोकांतिका असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
“सामान्य घरकुल लाभार्थ्यांसाठी नियम वेगळे आणि अवैध वाळू व्यावसायिकांसाठी नियम वेगळे का?” असा सवाल उपस्थित होत आहे. तहसीलदार अभय मस्के यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
या प्रकरणाची जिल्हाधिकारी महोदय दखल घेणार का?
की घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न असेच वाळूत रुतून राहणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.



