शहर

बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सूतगिरणीला घरघर; वीजपुरवठा खंडित, संपूर्ण कारखाना बंद १ कोटी ४० लाखांचे थकीत बिल, भ्रष्टाचार व मनमानी कारभाराचे गंभीर आरोप


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाच्या उद्देशाने पिंपळगाव येथे उभारण्यात आलेली बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सूतगिरणी आज पूर्णपणे बंद पडली आहे. संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांच्या कथित भ्रष्टाचार व अनियमित कारभारामुळे सूतगिरणीवर ही वेळ ओढवल्याचा आरोप सभासदांकडून करण्यात येत आहे.
सूतगिरणीत सुरुवातीला 12 मशिनरी कार्यरत होत्या. त्यावेळी प्रत्यक्षात सुमारे 350 एका वेळेस कामगार काम करत होते तर 900 कामगार तीन शिफ्टमध्ये काम करत होते. मात्र पुढील काळात राजकीय हेवेदावे, भ्रष्टाचार व संचालकांच्या मनमानी निर्णयांमुळे कारभार ढासळत गेला. परिणामी केवळ 4 मशिनरीवर उत्पादन सुरू ठेवण्यात आले. त्यावरही तीन शिफ्टमध्ये अवघे 90 कामगार, तर एकूण सुमारे 100 कर्मचारी कार्यरत होते.
अखेर आज, 26 डिसेंबर 2025 रोजी, सूतगिरणीचे वीजबिल तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये थकीत राहिल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण सूतगिरणी बंद पडली असून शेकडो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, कार्यकारी संचालक पातरी यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यापूर्वी त्यांनी ग्रॅज्युएटी फंडातून नियमबाह्य रक्कम उचलल्याचा आरोप झाला होता. या संदर्भातील बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतरच त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
सूतगिरणीतील कथित भ्रष्टाचाराबाबत माजी आमदार पंजाबराव खडकेकर यांनी यापूर्वी वारंवार तक्रारी केल्या असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषी संचालक मंडळ व माजी संचालक मंडळाकडून रक्कम वसूल करावी, अशी जोरदार मागणी सभासदांनी केली आहे.
सूतगिरणी बंद पडण्यामागे अनियमित कारभार, आर्थिक गैरव्यवहार व नियोजनाचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महागाव तालुक्यातील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानाही विक्रीत गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील दोन मोठे सहकारी उद्योग बंद पडल्याने स्थानिक अर्थव्यवस्था, शेतकरी व कामगारांवर गंभीर परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर “महागाव तालुक्यातील उद्योगधंदे बंद पडण्यास जबाबदार कोण?” असा सवाल आता सभासद व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button