Uncategorized

वसंतनगर लेवा येथे जलजीवन मिशनचे काम रखडले; टाकी उभी पण पाण्याचा पत्ता नाही उपशीर्षक:


अर्धवट पाईपलाईनमुळे नागरिक त्रस्त; रस्ते उकरून ठेवले, कामे ठप्प
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व हलगर्जीपणा समोर येत असून, वसंतनगर लेवा येथे या योजनेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गावात उभारण्यात आलेली पाण्याची टाकी अद्याप कार्यान्वित नसून, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही.
गावामध्ये ठिकठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले असले, तरी ती कामे अर्धवट अवस्थेत सोडण्यात आली आहेत. परिणामी रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाल्यांची कामेही अपूर्ण राहिल्यामुळे गावातील मूलभूत सुविधा विस्कळीत झाल्या आहेत.
‘घर-घर नळ’ योजनेचा गाजावाजा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात एकाही घरात नळाचे पाणी पोहोचले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, लोकप्रतिनिधींचा अभाव, तसेच अधिकारी व ठेकेदार यांच्यातील संगनमतामुळे कामे रखडली आहेत. काही ठिकाणी अंदाजे ४० टक्के बिल काढून ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडल्याचा आरोपही होत आहे.
या योजनेमुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ही योजना केवळ कागदोपत्री व भ्रष्टाचारासाठीच राबवली जात आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, रस्ते उकरून ठेवणे, त्यावर काँक्रीटीकरण न करणे, तसेच नाल्यांची अपूर्ण कामे यामुळे गावातील वाहतूक व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत नागरिकांनी दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व प्रकरणाची आमदारांनी तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई करावी, तसेच अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करून गावकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. तसेच, शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button