कृषि महाविद्यालय, उमरखेडच्या ‘रासेयो’ विशेष निवासी शिबिराचे पोफाळी येथे उत्साहात उद्घाटन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसद द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्न कृषि महाविद्यालय, उमरखेड यांच्या वतीने मौजे पोफाळी (ता. उमरखेड) येथे राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन विद्यापीठ कार्यक्रम समन्वयक (रासेयो) सौ. मंजुषा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. के. चिंतले होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरेश शिंदे (पोफाळी) उपस्थित होते. तसेच सरपंच सौ. रेखाताई स. क्षीरसागर व उपसरपंच सौ. मनिषा स. पायघन यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी व्यासपीठावर पोलीस पाटील श्री. माधवराव गुंढारे, श्री. संतोष क्षीरसागर, जिल्हा परिषद शिक्षक श्री. अरुण ठाकरे, सेवानिवृत्त अभियंता श्री. राजूभाऊ क्षीरसागर, श्री. प्रसाद नारायणराव पतंगराव तसेच महाविद्यालयातील डॉ. एस. बी. पवार, डॉ. एस. बी. सोळंके, श्री. वाय. एस. वाकोडे, कु. संगीता शिंदे व श्री. ए. के. गाडेकर उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. एस. बी. पवार यांनी शिबिरातील नियोजित उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या सात दिवसांच्या कालावधीत रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. व्ही. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 40 स्वयंसेवकांच्या सहभागातून ग्रामस्वच्छता, रक्तदान व रक्तक्षय तपासणी, महिला सक्षमीकरण, पटबंधारे बांधणे, शोषखड्ड्यांचे महत्त्व, मतदान जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, नशामुक्ती कार्यशाळा, सेंद्रिय शेती आणि जलसंधारण यांसारख्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासोबतच कृषी प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटक सौ. मंजुषा देशमुख यांनी तरुण पिढीमध्ये राष्ट्रसेवेची भावना रुजवण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राच्या रचनात्मक कार्यासाठी व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य एस. के. चिंतले यांनी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास पोफाळी येथील ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी रासेयो चमू परिश्रम घेत आहे.



