निष्क्रिय सार्वजनिक शौचालयाच्या जागेवर ‘वडार समाज भवन’ उभारण्याची मागणी; नगर परिषदेकडे निवेदन

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड, दि. _ : शहरातील प्रभाग क्र. 08 अंतर्गत सदानंद वार्ड, वडार चौक येथील अनेक वर्षांपासून वापरात नसलेले व जीर्ण अवस्थेत उभे असलेले महिला सार्वजनिक शौचालय हटवून त्या जागेवर वडार समाजासाठी सर्वसुविधायुक्त ‘वडार समाज भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी नगर परिषद उमरखेडचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित सार्वजनिक शौचालयाचा अनेक वर्षांपासून कोणताही वापर होत नसल्याने ती वास्तू जीर्ण, धोकादायक व निष्प्रयोजन बनली आहे. नगर परिषदेची ही मौल्यवान जागा सध्या कोणत्याही सार्वजनिक उपयोगात नसल्यामुळे तिचा लोकहितासाठी पुनर्वापर करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
वडार चौक परिसरात वडार समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती असूनही समाजासाठी स्वतंत्र समाज भवन उपलब्ध नाही. त्यामुळे सामाजिक मेळावे, शैक्षणिक मार्गदर्शन, महिला बचतगटांचे उपक्रम, युवकांच्या बैठका, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजहिताचे विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी कायमस्वरूपी जागेचा अभाव जाणवत आहे. यामुळे समाजाच्या संघटनात्मक व सर्वांगीण विकासावरही परिणाम होत असल्याची भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
नगर परिषदेने जनभावना लक्षात घेऊन निष्क्रिय सार्वजनिक शौचालय तातडीने पाडावे आणि त्या जागेवर आधुनिक सुविधा असलेले ‘वडार समाज भवन’ उभारण्यासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नगर परिषदेच्या मालमत्तेचा लोकहितासाठी प्रभावी उपयोग होण्याबरोबरच वडार समाजाला कायमस्वरूपी सामाजिक व शैक्षणिक केंद्र उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हे निवेदन नगरसेविका सौ. खुशबू पवन मेंढे व नगरसेवक श्री. अमोल दत्तात्रय तिवरंगकर यांनी सादर केले. यावेळी भाजपा युवा मोर्चा उमरखेड शहराध्यक्ष श्री. पवन मेंढे उपस्थित होते. त्यांनीही या मागणीला पाठिंबा देत नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या भावना व परिसराची गरज लक्षात घेऊन त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
वडार समाजाच्या सामाजिक प्रगतीसाठी हे समाज भवन महत्त्वपूर्ण ठरेल आणि शहराच्या विकासातही त्याची मोलाची भर पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
चौकट-
“वडार चौकातील महिला सार्वजनिक शौचालय अनेक वर्षांपासून बंद व निष्क्रिय आहे. नगर परिषदेची ही जागा लोकहितासाठी वापरली जावी, या उद्देशाने आम्ही येथे सर्वसुविधायुक्त ‘वडार समाज भवन’ उभारण्याची मागणी केली आहे. वडार समाजाकडे स्वतःचे समाज भवन नसल्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. नगर परिषद प्रशासनाने जनभावनांचा आदर करून हा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा. हा केवळ इमारतीचा विषय नाही, तर वडार समाजाच्या सन्मानाचा, एकतेचा आणि भावी पिढीच्या विकासाचा प्रश्न आहे. प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
सौ.खुशबू पवन मेंढे
नगरसेविका-प्रभाग क्रं.08
उमरखेड नगर परिषद
सदस्य-महिला व बालकल्याण समिती



