Uncategorized

पावसाने ओढ दिल्याने हिमायतनगर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती; खरिपासह हळद पीक धोक्यात, विमा मुदतीबाबत शेतकरी अंधारात!


​हिमायतनगर ( तालुका प्रतिनिधी शेख खय्युम 🙂 हिमायतनगर तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मृग आणि आद्रा नक्षत्रात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी शासकीय गोदामातून महाबीजचे बियाणे व अनुदानित खते आणून पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, आता कडक ऊन पडत असल्याने आणि जमिनीत ओलावा नसल्याने कोवळी खरीप पिके शेतातच जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे तालुक्यातील बळीराजावर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे.
​खरीप पिकांसोबतच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या हळद पिकालाही या दुष्काळी स्थितीचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे पाणी नसल्याने हळद सुकू लागली आहे, तर दुसरीकडे प्रशासकीय ढिसाळ नियोजनामुळे हळद उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. शासनाने हळदीचा समावेश हवामान आधारित पीक विम्यात केला खरा, मात्र कृषी विभागाकडून कोणतीही पूर्वकल्पना किंवा प्रसिद्धी न मिळाल्याने हळदीचा विमा भरण्याची मुदत (पोर्टल) कधी सुरू झाली आणि कधी संपली, याची साधी माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही.
​”पहिल्या टप्प्याची माहिती प्रशासनाने वेळेत दिली नाही, त्यामुळे आम्ही विम्यापासून वंचित राहिलो. आता यापुढील पिकांचे विमा हप्ते आणि पाण्याच्या नियोजनाची माहिती तरी कृषी विभागाने वेळेत द्यावी,” अशी संतप्त मागणी शेतकरी करत आहेत. एकीकडे निसर्गाचा दुष्काळ आणि दुसरीकडे माहितीचा अभाव अशा कात्रीत हिमायतनगरचा शेतकरी अडकला असून, प्रशासनाने तात्काळ या भागात दुष्काळी उपाययोजना कराव्यात आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button