फुलसांगी येथे वाहतूक नियंत्रणासाठी संयुक्त मोहीम हेल्मेट सक्ती, अतिक्रमण हटवून अपघात रोखण्यावर भर

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील फुलसांगी येथे दिनांक 25 12 2025 रोजी उंबरखेड वाहतूक शाखा व पुसद वाहतूक शाखेच्या वतीने संयुक्त वाहतूक नियंत्रण मोहीम राबविण्यात आली. गुरुवारी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी व वाढते अपघात लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच वेगमर्यादा व इतर वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले. बसथांब्यांवरील तसेच रस्त्यालगत दुकानदारांनी केलेले अतिक्रमण काढून टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
ग्रामीण भागात वाहतूक नियम हे केवळ सल्ला नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी आवश्यक शिस्त असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून अनेक वाहनचालकांनी त्वरित नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक शिस्त व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
ही मोहीम वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल गुंडे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यावेळी वाहतूक शाखेचे कर्मचारी संजय जाधव, नागेश वास्तव, शरद राठोड, सुरेश पवार, शांताराम पठारे आदी उपस्थित होते.
महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज व पीएसआय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई यशस्वीपणे पार पडली.



