महागावात मतदार यादी छाननीत अनियमिततेचा आरोप; नागरिकांमध्ये संताप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : शहरातील प्रभाग क्रमांक 68, 69, 70 आणि 71 मध्ये मतदार यादी छाननीदरम्यान गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बीएलओ (Booth Level Officer) यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्याऐवजी याद्या थेट नगरसेवकांच्या हाती दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे छाननी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही बीएलओनी दोन नगरसेवकांच्या माध्यमातूनच पुरावे गोळा करण्याची पद्धत अवलंबली आहे. यामुळे त्यांच्या मर्जीतील व्यक्तींची नावे यादीत ठेवली जात असल्याचा आरोप होत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 14 मध्ये तर कोणतीही घरभेट न देता छाननी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकारामुळे भविष्यात मतदार यादीत बोगस नावे समाविष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्ता जयंत चौधरी यांनी तक्रार करत संबंधित बीएलओंना तत्काळ ताकीद देण्याची मागणी केली आहे. शासनाच्या नियमांनुसार घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करूनच मतदार यादी तयार करावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.



