थकीत संचालकांच्या बळावर बँक प्रतिनिधी! पेढे सोसायटीचा ठराव बेकायदेशीर; अपात्रतेची कारवाई सुरू

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पेढे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत थकीत कर्जदार संचालक असूनही त्यांना अपात्र न करता यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप रमेश राठोड यांनी केला आहे . या प्रकरणी दिनांक 16- 12 -2025 रोजी रमेश राठोड यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पुसद यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, थकीत संचालकांच्या सहभागाने पारित ठराव व प्रतिनिधी निवड प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी अधिनियमाच्या विरोधात असून, संस्था व प्रतिनिधी दोन्ही अपात्र ठरतात. किमान दहा संचालक थकीत असल्याने सोसायटी बरखास्तीच्या पात्रतेत येते, असेही नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीची दखल घेत सोमवारी सहाय्यक निबंधकांनी सचिवांना संपूर्ण दप्तरासह कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी शिरपूर येथे संपूर्ण संचालक मंडळ अपात्र करण्यात आले होते; त्याच धर्तीवर पेढे सोसायटीवर कारवाईची मागणी होत आहे.
महागाव तालुक्यातील इतर संस्थांतील थकीत संचालकांनी पाठवलेले प्रतिनिधीही आपोआप अपात्र ठरतात, अशी तक्रार असून,
तात्काळ चौकशी, संचालक व प्रतिनिधी अपात्र ठरवणे व गरज पडल्यास सोसायटी बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे.



