रेती तस्करांचा एपीआयवर प्राणघातक हल्ला; बचावासाठी हवेत गोळीबार महागाव तालुक्यात वाळू माफियांची दहशत; परिसरात तणाव, SRPF तैनात

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात अवैध रेती तस्करांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) सकाळी वाकोडी (वाडी)–मोरथ परिसरात रेती तस्करांनी थेट पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिस पथकावर पाच जणांच्या टोळीने हल्ला चढवला. या हल्ल्यात महागाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) सुनील अंबुरे जखमी झाले.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच एपीआय अंबुरे यांनी स्वतःच्या बचावासाठी हवेत दोन राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात गुलाब खाजा शेख हा एक आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारी म्हणून SRPF व दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे महागाव परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले असून वाळू माफियांचे संघटित आणि सशस्त्र नेटवर्क कार्यरत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. महसूल यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वीही तालुक्यातील काळी (टेंभी) परिसरात तलाठी गणेश मोळके यांच्यावर रेती माफियांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
पत्रकारांनाही सातत्याने धमक्या मिळत असल्याचे प्रकार वाढत असून, कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
नागरिकांची ठाम मागणी
रेती तस्करीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने समन्वय साधून कठोर आणि व्यापक कारवाई करावी, दोषी अधिकाऱ्यांवरही चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
(बॉक्स)
प्रशासनातील कथित हप्तेखोरी, मस्तवाल झालेले रेती तस्कर आणि ढासळलेली कायदा-सुव्यवस्था हे वाकोडी (वाडी) येथील घटनेतून पुन्हा एकदा समोर आलेले भीषण वास्तव असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.



