ढाणकी यात्रेच्या आड जुगाराचा खुलेआम बाजार पोलिसांचे संरक्षण कुणाला? – नागरिकांचा थेट सवाल**

महागाव | प्रतिनिधी : संजय नागरगोजे
ढाणकी शहरात सुरू असलेल्या यात्रेत श्रद्धेच्या नावाखाली जुगाराची जत्रा भरल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या ढाणकीत एकीकडे भक्तीभाव, पूजा-अर्चा सुरू असताना, दुसरीकडे मात्र यात्रेच्या परिसरात खुलेआम अवैध जुगार सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत.
फुलसांगी रोडवरील मोकळ्या जागेत भरलेल्या यात्रेत पेंडॉल उभारून ‘खुशी मर्जी’, लकी नंबर तसेच पत्त्यांचा जुगार बिनधास्तपणे चालवला जात आहे. बॅनरवर आकडे लिहून नागरिकांना त्या आकड्यांवर पैसे लावायला प्रवृत्त केले जात असून, मोठ्या पाळण्याजवळ हा प्रकार जोरात सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ढाणकी हे विदर्भ–मराठवाड्याच्या सीमेवरील महत्त्वाचे बाजारपेठ असलेले शहर असून, महानुभव पंथाचे श्रद्धास्थान म्हणूनही ओळखले जाते. असे असतानाही इतका उघडपणे जुगार सुरू असताना ढाणकीचे API आणि बिटरगाव पोलीस ठाणे डोळेझाक का करत आहेत? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ढाणकी शहरात मटका, चक्री मटका व अवैध जुगाराचे प्रकार नवीन नसून, यात्रेच्या निमित्ताने हे नेटवर्क अधिक खुलेआम सुरू असल्याचा आरोपही होत आहे. जुगाराचे अड्डे निर्भयपणे सुरू असताना यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे, हा प्रश्न अधिक तीव्र होत आहे.
पोलीस ठाण्यातील कथित वसुलीबाज यंत्रणा तात्काळ हटवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 2023 नंतर बदल्या होऊनही काही ठिकाणी जुनीच यंत्रणा कायम राहून तडजोडीचे प्रकार सुरू असल्याचे आरोपही पुढे येत आहेत.
या प्रकरणाची DB पथकासह अन्य स्वतंत्र पथकांकडून सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ढाणकीतील नागरिकांनी केली आहे.
आता प्रश्न एकच आहे —
पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी याकडे लक्ष देणार का?
की यात्रेआड जुगाराचा हा खेळ असाच सुरू राहणार?



