Uncategorized

महागावमध्ये अवैध रेतीवाहतूक प्रकरण — स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कारवाई; महसूल विभागावर हलगर्जीपणाचा आरोप

महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तहसील क्षेत्रात अवैध रेती वाहतूक तहसीलदारांच्या मौन मान्यतेखाली सुरू असल्याचे वारंवार पुढे येत असताना, आज 5 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हा शाखा व महागाव पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध रेतीतस्करीचे जाळे उघडे पाडले.

हिंगणी–पांदन रस्त्यावर सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत ४ ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. अवैध रेती वाहतूक करताना पकडलेल्यांमध्ये :

अमोल शामराव नकाते (रा. फुलसांगी)

संदीप यादव राहटे (रा. चिंचोली)

गजानन बापूराव आवळे (रा. हिंगणे)

अक्षय गणेश इंगोले (रा. हडसनी)

यांचा समावेश आहे.

फुलसांगी गावाजवळील पैनगंगा नदीपात्रातून दररोज शंभर ते दोनशे वाहनांद्वारे अवैधरित्या रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने तस्करांचे मनोबल वाढले असून, अधिकारी ‘संरक्षण’ देत असल्याचे आरोप स्थानिक पातळीवर सातत्याने होत आहेत.

स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आज हिंगणी-पान रस्त्यावर थेट छापा घालून रेतीने भरलेले चार ट्रॅक्टर आणि आणखी एक वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत 16 लाख 24 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या घटनेनंतर महागाव महसूल विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महसूल अधिकाऱ्यांनी योग्य वेळी कारवाई न केल्याने अवैध रेतीउत्खननाला चालना मिळाल्याचे स्पष्ट झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींवर भादवि कलम 379(2) व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 48(7) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे महसूल विभागातील कार्यपद्धतीचा भांडाफोड झाला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button