शहर

महागाव: जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ‘आयात’ उमेदवारांची चलती; जुने-जाणते कार्यकर्ते अडचणीत

महागाव (प्रतिनिधी संजय नागरगोजे)
महागाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या ‘आयात’ कार्यकर्त्यांना तिकीट मिळण्याची चिन्हे दिसत असल्याने जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत घरदार सोडून काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांना ऐनवेळी डावलले जाण्याचे चित्र असल्याने ते प्रचंड अडचणीत आले आहेत.
आरक्षणामुळे मोठी उलथापालथ:
तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांपैकी चार गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत, तर पंचायत समिती सभापतीपदही महिलेसाठी सुटल्याने मोठे राजकीय बदल झाले आहेत. यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पुरुष इच्छुकांचा हिरमोड झाला असून, त्यांनी आता महिला उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.
निष्ठावान ‘सतरंज्या उचलण्यापुरतेच’?
ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे वेळ दिला, त्यांना डावलून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेल्या नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात असल्याची चर्चा आहे. यामुळे “आम्हाला फक्त सतरंज्या उचलण्यापुरतेच पक्षात काम करावे लागते का?” अशी संतप्त भावना निष्ठावान कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्वयंघोषित उमेदवारांचे ‘बॅनर’ युद्ध:
पक्षांकडून अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा झाली नसतानाही प्रमुख पक्षांतील अनेक इच्छुकांनी ‘स्वयंघोषित उमेदवार’ म्हणून निवडणुकीचे मैदान गाठले आहे. “जनतेचा उमेदवार,” “विकासासाठी तत्पर” अशा घोषवाक्यांनी सजलेले बॅनर, शुभेच्छा फलक आणि सोशल मीडिया पोस्ट्सचा ग्रामीण भागात चांगलाच बोलबाला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा फलकांच्या माध्यमातून इच्छुकांनी आपली राजकीय उपस्थिती ठळक केली आहे. गट व गणाचे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी आपापल्या सोयीच्या ठिकाणी प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. महागाव तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांमध्ये स्वयंघोषित उमेदवारांचे बॅनर झळकत असल्याने पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे.
थोडक्यात: आयात उमेदवारांमुळे खऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना महागाव तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button