महागाव: ‘एकतर्फी प्रेम’ नव्हे, बलात्काराने तरुणीची आत्महत्या; PM अहवालातून सत्य उघडकीस, तिघांना अटक

महागाव प्रतिनिधी – संजय नागरगोजे
महागाव: महागाव तालुक्यात वाडी येथे कथित ‘एकतर्फी प्रेमातून’ तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणि वैद्यकीय तपासणी अहवालानंतर या घटनेला अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. मुलाने पीडित तरुणीवर जोर-जबरदस्तीने अत्याचार केल्यामुळेच तिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
शवविच्छेदन अहवाल ठरला महत्त्वाचा:
सोळा ऑक्टोबर २०२५ रोजी मुलीने उंदराचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने यवतमाळ येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वडिलांनी (देवराव मारुती रणमले) पोलीस स्टेशन येथे प्रथम जबानी रिपोर्ट दिला होता.
शवविच्छेदन (PM) आणि वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणातील सत्यता लक्षात आली. वैद्यकीय अहवालात अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा आई-वडिलांचे बयान नोंदवले आणि गुन्ह्याच्या कलमांमध्ये वाढ केली.
आरोपींसह आई-वडिलांना अटक:
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी १) एकनाथ विश्वनाथ रीठे, तसेच त्याचे वडील २) विश्वनाथ रीठे आणि आई ३) पुण्यरता बाई रीठे या तिघांना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक केली आहे.
आरोपींविरुद्ध भादंविच्या कलमांसह पॉक्सो (POCSO) कायद्याचे कलम ४, ८, १२, १७ आणि कलम ६४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (अ. क्र. ५२४/२५). अटक केलेल्या आरोपींना दोन दिवसांचा पीसीआर (पोलीस कोठडी रिमांड) घेऊन, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी एमसीआर (न्यायालयीन कोठडी रिमांड) अंतर्गत सेंट्रल जेल येथे रवाना करण्यात आले आहे.



