फुलसावंगी गावात अभूतपूर्व पूरस्थिती – तातडीने प्रशासनाने लक्ष घालावे

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
दुपारी १२ वाजल्यापासून फुलसावंगी गावाचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावाच्या इतिहासात कधीही न पाहिलेला एवढा मोठा पूर यावर्षी पहिल्यांदा आला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोबाईल नेटवर्क पूर्णपणे खंडित झाल्यामुळे बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे आणि गावातील गंभीर परिस्थितीबाबत योग्य माहिती वेळेवर पोहोचू शकत नाही.
अनेक नाल्यांना लागून असलेल्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून नागरिक अडकून पडले आहेत. शेतकऱ्यांचे जनावरे, गोठे, तसेच शेतात उभे असलेले पिके व सौरऊर्जा यंत्रणा पाण्यात वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून या संकटामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपजीविकेचे मोठे संकट ओढावले आहे.
इतक्या गंभीर परिस्थितीत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बचावकार्य सुरू करणे ही अत्यावश्यक बाब आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांना निवारा, अन्नधान्य व वैद्यकीय मदत पुरवणे ही वेळेची गरज आहे. नेटवर्क बंद असल्यामुळे परिस्थितीची योग्य माहिती वेळेत मिळत नसल्याने गावकऱ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत.
माननीय तहसीलदार साहेबांनी तात्काळ या परिस्थितीकडे लक्ष घालून प्रशासन यंत्रणा गावात पोहोचवावी, जेणेकरून नागरिकांचे प्राण वाचतील आणि शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात तरी भरून निघेल.
फुलसावंगीकर आज जीवाच्या भीतीने जगत आहेत. त्यांचे प्राणरक्षण, उपजीविकेचे संरक्षण आणि भविष्यातील मदत व पुनर्वसनासाठी शासनाने त्वरित आणि प्रभावी पावले उचलणे हीच सध्याची मोठी गरज आहे.



