शहर

महागाव नगरपंचायतीत राजकीय हालचालींना वेग १३ फेब्रुवारीला अविश्वास प्रस्तावावर मतदान?


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून १३ फेब्रुवारी २०२६ रोजी अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भातील अधिकृत नोटीस सर्व नगरसेवकांना प्राप्त झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, काँग्रेस गटनेते व्हीप बजावणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्याची चर्चा असून, त्यांनी अपक्ष नगराध्यक्षांविरोधात मतदान करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. मात्र, पक्षाच्या भूमिकेनुसार मतदान न केल्यास संबंधित सदस्यांवर कारवाईची शक्यता असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया, व्हीपचे पालन आणि संभाव्य अपात्रता याबाबत कायदेशीर बाबींची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांकडून होणार असल्याने पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. काही सदस्यांनी गरज पडल्यास न्यायालयात दाद मागण्याची भूमिकाही घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, नगरपंचायतीचा कार्यकाळ संपण्यास अवघे नऊ महिने शिल्लक असताना सुरू असलेल्या या राजकीय हालचालींमुळे विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. शहरात मुख्याधिकारी पद दीर्घकाळ रिक्त असल्याची चर्चा असून प्रशासनिक कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सत्ता कोणाचीही असो, नगरपंचायतीत स्थिर प्रशासन आणि विकासकामांना प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button