शहर

अवैध वाळू वाहतुकीवर हिमायतनगर पोलिसांची मोठी कारवाई; ३० लाखांच्या मुद्देमालासह दोन हायवा जप्त


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत हिमायतनगर पोलीस ठाण्याला मोठे यश आले असून, २ जुलै २०२६ रोजी सलग दोन धडक कारवायांमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
​पहिली कारवाई: सोनारी टोलनाक्यावर मध्यरात्री थरार
​पोलीस निरीक्षक श्री. लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना, २ जुलै रोजी मध्यरात्री १:०० वाजण्याच्या सुमारास मौजे सोनारी येथील टोलनाक्यावर एक संशयास्पद हायवा ट्रक (क्र. MH-26-BL-8061) अडवण्यात आला. तपासणी केली असता, हा ट्रक विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करत असल्याचे उघड झाले.
​पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक आणि १६ हजार रुपयांची ४ ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी चालक बाबुराव गणपती कोठुळे व वाहन मालक विनायक हनुमंतराव हजापुरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) आणि गौण खनिज अधिनियम कलम ४, २१ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १७९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​दुसरी कारवाई: पोटा (बु.) बसस्थानक परिसरात पहाटे छापा
​पहिली कारवाई करून काही तास उलटत नाहीत तोच, पोलिसांनी पहाटे ५:२० वाजण्याच्या सुमारास मौजे पोटा (बु.) बसस्थानक परिसरात दुसरी मोठी कारवाई केली. येथेही विनापरवाना बेकायदेशीर वाळू घेऊन जाणारा दुसरा हायवा ट्रक (क्र. MH-26-AD-2214) पोलिसांनी रंगेहात पकडला.
​या कारवाईतही १५ लाख रुपयांचे वाहन आणि १६ हजार रुपयांची ४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या दुसऱ्या प्रकरणात चालक विजय गोविंद जाधव व वाहन मालक राजेश्वर काशिनाथ राचेवाड यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १८०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पोलीस प्रशासनाचा कडक इशारा
​या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २ हायवा ट्रक (किंमत ३० लाख रुपये) आणि ८ ब्रास वाळू (किंमत ३२ हजार रुपये) असा एकूण ३०,३२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शेख आणि पोलीस अंमलदार नागरगोजे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button